आम्ही चंद्रावर गेलो तर.... (कल्पनाप्रधान निबंध किंवा कल्पनाविलासात्मक निबंध)

  आम्ही चंद्रावर गेलो तर....
(कल्पनाप्रधान निबंध किंवा कल्पनाविलासात्मक निबंध)

मुद्दे : चंद्राचे आकर्षण - रामाला चंद्र हवा - वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न - चांद्रमोहिमेत सहभागी व्हावे - चंद्रावरचा ससा - चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल - संदेश वाहिनी - उपाहारगृह - पृथ्वी, चंद्र ये-जा - उत्सुकता.


     चंद्राचे मानवी मनाला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी ही 'चंद्र हवा' म्हणून कौशल्या मातेकडे हट्ट धरला आणि मग आरशातून चंद्राचे प्रतिबिंब दिसतात तो छोटा राजकुमार हर्षभरित झाला. अशी कथा आहे. चंद्रा विषयीच्या मानवाच्या या आकर्षणाची परिणीती म्हणजे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून मानवाने चंद्रावर केलेले पदार्पण होय.


     नील आर्मस्ट्रॉंग या अमेरिकन अवकाशयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. मानवाचे चंद्रावरील चिमुकले पाऊल म्हणजे त्याची विज्ञानाच्या आधारे अवकाशातील प्रचंड झेप होती. या यशस्वी चंद्र मोहिमेनंतर चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहू लागला. माझ्या मनात आले - अशाच एका मोहिमेतून मला चंद्रावर जायला मिळाले तर!


     ... तसे झाले तर! फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना दुणूटुणू उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वी माता कशी दिसते, ते मी पाहीन.


     चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेश वाहिनी असणारच! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वी मातेचे धावते समालोचन माझ्या घरच्या माणसांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमलेच, तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरु करीन. क्षुधा - तृषा शमन करणाऱ्या त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये येथे मिळू शकतील.


     चंद्रावर लुब्ध होऊन पृथ्वीवरील विशेषतः माझ्या महाराष्ट्रातील कवींनी रचलेल्या कविता व इतर साहित्य त्या उपाहारगृहात विक्रीसाठी ठेवीन. चंद्रावरील तरुण जोडपी कदाचित 'मधूचंद्रा' ऐवजी 'मधुवसुंधरा' साठी पृथ्वीवर येण्यास आतुर होतील. अशावेळी शक्य तर त्यांना पृथ्वीवरील प्रवासाची सोयही मी करीन. पण हे सारे केव्हा? - जर मला चंद्रावर जायला मिळाले तर!!